नागपूर : नागपूर ग्रामीणमधील एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण पथकप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्रा प्रभू गिरी(३४) यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. चोरीच्या गुन्ह्यातील तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी लाच मागितली होती.
तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. आरोपी पोलिस उपनिरीक्षक गिरी यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास तयारी दर्शवली. पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण कक्षात पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.
विशेष म्हणजे याआधी दोन दिवसांपूर्वीच कोराडी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमानंद दादाराव कात्रे (४३) यांनाही दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. तक्रारदारावर कारवाई न करता प्रकरणाचे सेटलमेंट करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. सलग दोन दिवसांत पोलिस अधिका-यांवर झालेल्या या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.