22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरमोदींच्या फोटोने खतांच्या विक्रीला ब्रेक; दुकानदारांना सोसावा लागतोय भुर्दंड

मोदींच्या फोटोने खतांच्या विक्रीला ब्रेक; दुकानदारांना सोसावा लागतोय भुर्दंड

सोलापूर : लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच समीकरण आपल्याकडे गेल्या दहा वर्षांपासून आहे. लोकसभा निवडणुकीच आचारसंहिता एकीकडे जाहीर झाली असताना दुसरीकडे जिल्ह्यातील खत विक्रेते वेगळ्याच चिंतेत आहेत. खतांच्या पिशव्यांवर असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खत विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आचारसंहितेत खताची विक्री करायची कशी? हा प्रश्न त्यांना पडला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खतांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावून जाहिरात करण्यात आल्याचे दिसले. सर्वच कंपन्यांनी युरिया, डीए‌पीच्या पिशवीवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र लावले आहे. या प्रयत्नांमुळे पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेही असतील परंतु आचारसंहिता काळात खत विक्रेत्यांच्या रोजी-रोटीवरच आता परिणाम होऊ लागला आहे. यावर्षी वेळेवर पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खत विक्री वेळेत व चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना होती. प्रत्यक्षात मात्र आता खत विक्रीसाठी मोदींचों प्रतिमा झाकण्याचा भुर्दंड (हमाली वस्टिकरचा खर्च) सहन करण्याचा किंवा आचारसंहिता संपेपर्यंत वाट पाहण्याचा विक्रेत्यांपुढे पर्याय दिसत आहे.

आचारसंहितेचे पालन होणे व शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे केंद्र शासनाने या संदर्भात काय सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील खतांची स्थिती काय आहे? या संदर्भातील माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगीतले. खतांच्या पिशवीवर असलेले पंतप्रधान मोदी यांचे छायाचीत्र झाकून विक्रेत्यांनी खतांची विक्री करावी, अशा सूचना आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाल्या आहेत. त्या दृष्टीने आम्ही विक्रेत्यांना तोंडी सूचना दिल्या आहेत. असे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगीतले. गोदामात खतांच्या पिशव्यांच्या थप्प्या लागल्या आहेत, एक पिशवी हलविण्यासाठी हमाली लागते. सध्या हमाल मिळणे कठीण आहे. मार्च अखेर असल्याने इतर महत्त्वाची कामे आहेत. खतांवरील मोदीच्या छायाचित्राचे काय करायचे? हा प्रश्न सध्या सर्वच दुकानदारांना भेडसावत आहे.

बाजारात सातत्याने पेरणीच्या कालावधीत तर खत मिळणे मुश्कीलच असते. सध्या काही ठिकाणी युरिया उपलब्ध आहे मात्र ते लिंकिंगमध्ये असल्याने युरियाच्या पोत्यासोबत दुसरे खत घ्यावे लागते. अन्यथा ३० रुपये जास्त मोजावे लागतात. पंतप्रधानांचे छायाचित्र असणाऱ्या या पोत्यामागे असा भ्रष्टाचार सुरू आहे. असे शेतकरी वामन भोसले म्हणाले.खत दुकानांच्या बाहेर पंतप्रधान मोदी यांचे फलक लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आम्ही फलक ठावले होते. आचारसंहितेत हे फलक काढले. खतांच्या पिशवीवरील पंतप्रधानांचे छायाचित्र झाकणे खर्चिक आहे. त्यासाठी लागणारा खर्च कोणी करायचा? हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR