27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeराष्ट्रीयदंतेवाडामध्ये भीषण चकमक; ३ नक्षलवादी ठार

दंतेवाडामध्ये भीषण चकमक; ३ नक्षलवादी ठार

दंतेवाडा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. गृहमंत्र्यांच्या घोषणेनुसार, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे. मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये २५ लाखांचे बक्षीस असलेल्या सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन इंसास रायफल, ३०३ रायफलसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गीडाम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गिरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली या सीमावर्ती भागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीआरजी आणि बस्तर फायटरच्या पथकाने शोधमोहीम राबवली. यावेळी सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादी जागीच ठार झाले.

त्यातील एकाचे नाव सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली असे असून त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. अन्य दोन नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तू सापडल्या आहेत.

सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणात कारवाई
बस्तरचे पोलिस महानिरीक्षक श्री सुंदरराज पी. यांनी सांगितले की, सरकारच्या सूचनेनुसार, डीआरजी, एसटीएफ, बस्तर फायटर्स, कोब्रा, सीआरपीएफ, बीएसएफ, आयडीबीपी आणि सीएएफ यांची संयुक्त टीम लोकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सतत सक्रिय आहे. गेल्या ८३ दिवसांत १०० हून अधिक कट्टर माओवाद्यांना विविध कारवाईत ठार करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच छत्तीसगडमधील बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठा हल्ला केला आणि दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत एक जवानही शहीद झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR