मुंबई : प्रतिनिधी
शहरातील अंधेरी पूर्वेत असलेल्या एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास चार ते पाच लाकडाच्या दुकानांत भीषण आग लागली. लाकूड गोदामात सिलिंडरचे स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाळे आहेत. या गाळ््यांमध्ये केमिकल आणि लाकडाचा गोदाम असल्याने ८ ते १० गाळ््यांत आग भडकली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. दरम्यान, सुदैवाने यात जीवित हानी झाल्याचे वृत्त रात्री उशिरापर्यंत आले नव्हते.
आगीचे वृत्त समजताच स्थानिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले. तसेच परिसरातील नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीत आठ ते दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत युद्ध पातळीवर सुरू होते. या सर्व गोदामात मोठ्या संख्येने काम करणारे कामगार आहेत. मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच काही कामगार बाहेर निघाल्याची माहिती मिळाली.
काही कामगार आत अडकल्याची सुरुवातीला भीती व्यक्त करण्यात आली. आगीचा भडका उडाल्याने आजूबाजूची घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. परिसरातील पंधरा ते वीस घरे आणि गोदाम जळून खाक झाले आहे. ही आग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
सिलिंडर स्फोटामुळे परिसरात भडकली आग
घरांत आणि गोदामात मोठ्या प्रमाणात सिलिंडर असल्याने त्याचा स्फोट होऊन ही आग वाढली. झोपडपट्टीमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम एमआयडीसी पोलिसांनी सुरू केले. मात्र, मोठ्या प्रमाणात सिलिंडर स्फोट होऊ लागल्याने अग्निशमन दलातील जवानांना आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि झोपडपट्टी परिसर खाली केला.