हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद शहरात गुरुवारी एका बेकरीमध्ये गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत पंधरा कामगार जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. कामगारांचा एक गट त्यांच्या कामात व्यस्त असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींपैकी १० जणांना कांचनबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि इतर पाच जणांवर शमशाबाद येथील अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. जखमींपैकी बहुतांश उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जखमींना चांगले वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.