23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या ११ जागांसाठी २५ जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी २५ जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई, दि.२४(प्रतिनिधी) विधानसभेतून विधानपरिषदेवर पाठवण्यात येणा-या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी उद्या, २५ जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता असून, आमदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

विधानपरिषदेचे भाई गिरकर, रामराव पाटील, रमेश पाटील (भाजप) वजहत मिर्झा, प्रज्ञा सातव (काँग्रेस),निलय नाईक, बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी, अजित पवार गट)मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट),अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट)महादेव जानकर (रासप) जयंत पाटील (शेकाप) या अकरा सदस्यांची मुदत संपत असून, त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. उद्या २५ जूनला या निवडणुकीची अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. २ जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असेल. ३ जुलै रोजी छाणणी झाल्यानंतर ५ जुलै पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. १२ जुलै ला मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

आमदार सांभाळण्याचे आव्हान !

विधानसभेतील १४ जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीतील विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा २२.८४ एवढा आहे. म्हणजेच २३ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ बघता भाजपाच्या चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्तेकी दोन, आघाडीकडून काँग्रेसच्या दोन व ठाकरे आणि शरद पवार गटाची मिळून एक अशा जागा निवडून येऊ शकतात. मात्र ही निवडणूक गुप्त मतदानाने होते व सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये सध्या चुळबुळ आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास मतांची फाटाफूट व घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी २० जून २०२२ ला विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक झाली होती व मतदानानंतर एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांनी बंड केले होते. मतं फुटल्याने काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा तेव्हा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीत बदलेलेल्या राजकीय परिस्थितीमुळे काही आमदारांना घरवापसीचे वेध लागले आहेत. त्यामुळे यावेळी काय होणार याबद्दल प्रचंड कुतूहल असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR