कोल्हापूर : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्यासाठी अंतिम मुदत होती, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी अर्ज माघार घेतली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार नसल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
खासदार शाहू महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. काल अचानक दुपारी तीन वाजता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे गोंधळ उडाला. यानंतर आमदार सतेज पाटील आणि शाहू महाराज कलेक्टर ऑफिसमध्ये दिसले. यावेळी सतेज पाटील संतापले होते.
शाहू महाराजांनी निवेदन केले प्रसिद्ध
सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला व शाहू महाराज काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देणार असे बोलले जात होते. यावर शाहू महाराजांनी निवेदन जारी केले आहे. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही, असे शाहू महाराजांनी स्पष्ट केले. तसेच एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव कॉंग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती, असेही ते म्हणाले.
याचवेळी लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला, असे महाराज म्हणाले.