इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नवीन सरकारबाबतचा सस्पेन्स संपला आहे. १२ दिवसानंतर नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपुल्स पार्टीच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पक्षांमध्ये दिर्घकाळ चर्चा सुरू होती. मंगळवारी रात्री दोन्ही पक्षांच्या हायकमांडने आघाडीचे सरकार बनवण्याची घोषणा केली आहे.
पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी पीएमएल-एन यांच्याकडून शहबाज शरीफ हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. दोन्ही पक्ष आघाडीने पाकिस्तानचे सरकार चालवतील. पीपीपी आणि पीएमएल-एन यांनी आवश्यक संख्याबळ जमवले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्ष आघाडीचे सरकार पाकिस्तानात आणण्याची तयारी करत आहेत. तसेच चर्चेनुसार, पीपीपीचे सहअध्यक्ष आसिफ जरदारी हे देशाचे राष्ट्रपती बनतील. तर पीएमएल पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवडले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचसोबत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ यांच्या पक्षाचे उमेदवार आणि सुन्नी इत्तेहाद कौन्सिल केंद्रात सरकार बनवण्यासाठी संसदेत बहुमत मिळवण्यास अपयशी ठरलेत. सध्या पाकिस्तानात आर्थिक संकट आहे. मात्र त्यातही बिलावल भुट्टो आणि नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या युतीने बाजारात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसत आहे. शहबाज शरीफ दुस-यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इम्रान खान यांना सत्तेतून हटवल्यानंतर शहबाज शरीफ पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान बनले होते. एप्रिल २०२२ आणि ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांनी देशाचा कारभार सांभाळला.
देशात आर्थिक संकट
बिलावल भुट्टो यांना पुन्हा एकदा वडील आसिफ अली जरदारी यांना राष्ट्रपती पदावर पाहायचे आहे. दिवंगत पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे पती जरदारी २००८ ते २०१३ पर्यंत राष्ट्रपती होते. सध्या देशात फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या आगीतून देशाला बाहेर काढण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ते आसिफ अली जरदारी यांच्यात आहे असे बिलावल भुट्टो यांनी सांगितले.