सेलू : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूच्या कार्यालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि दिरंगाई केल्याच्या कारणास्तव जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी बाजार समितीचे सचिव वाघ राजीव वाघ यांना निलंबित करण्याचे आदेश काढलेले आहेत.
याबाबतचे वृत्त असे की मागील काही महिन्यांपासून सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयीन कामकाजात फार मोठ्या प्रमाणात दिरंगाई व अनियमितता झाली असल्याबाबतची तक्रार बाजार समितीचे उपसभापती प्रकाश मुळे व इतर १४ संचालकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी तीन सदस्य समिती नेमून याबाबतचा अहवाल मागवला होता.
सदर समितीने अहवालात स्पष्ट नमूद केलेले आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सचिव यांनी केवळ तीन मुद्यांचेच स्पष्टीकरण चौकशी समितीला दिलेले होते व इतर मुद्यांचे कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नसल्यामुळे शिवाय गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बाजार समितीच्या नियमित बैठकांचे देखील आयोजन केलेले नाही ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असल्यामुळे जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सचिव राजीव रावसाहेब वाघ यांच्या सह्यांचे अधिकार ताबडतोब थांबवावेत व त्यांना निलंबित करावे या आशयाचे आदेश आज रोजी दिलेले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिवारात मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झालेली आहे.