मुंबई : प्रतिनिधी
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि जे मरण पावले त्यांच्या परिवाराच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय याआधीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.