मुंबई : मुंबईतील आमदार निवासाला आग लागल्याची धक्कादायक घटना आज पहाटे समोर आली. मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाला ही आग लागली. हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांच्या रूममध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास मधील खोली क्रमांक ३१३ मध्ये ही आग लागली आहे. या खोलीमध्ये असलेल्या एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. वेळीच लक्षात आल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेला माहितीनुसार, आज सकाळी खोली क्रमांक ३१३ मधील एसीमध्ये अचानक स्फोट होऊन आग लागली. या वेळी खोलीतील नागरिकांनी तात्काळ सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकांनी खोलीतील सर्वांना सुरक्षित स्थळी हलवले आणि आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगमीवर नियंत्रण मिळवले. आता या आधी संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
अधिका-यांवर कारवाई करावी : संजय गायकवाड
आमदार निवासाकडे अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. दुर्घटना ही कधीही होऊ शकते, ती काही सांगून होत नाही. अशा वेळी आमदार निवासस्थान असलेल्या इमारतीमध्ये अग्निशामक यंत्रणा लावलेली असूनही त्याची एक्सपायरी डेट गेलेली आढळून आली. इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही. यावर अधिका-यांवर राज्य सरकारने कारवाई करायला हवी, असे देखील आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. सर्वच आमदार निवासाची अशीच अवस्था झालेली आहे. आम्ही अधिका-यांना अनेक वेळा ते दाखवून दिलेले आहे. त्यामुळे या संदर्भात अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.