सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसीतील रस्ता भागातील आशानगरजवळील विठ्ठलनगरात लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. नबीलाल महिबूब बागवान यांचे सना कॉटन वेस्ट नावाचे दुकान विठ्ठल नगरात आहे.
दुपारी सव्वा तीनच्या सुमारास या दुकानात अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात निघालेले काळेकुट्ट धुराचे लोळ दूरवरुन दिसून येत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व आग विझविण्यास सुरूवात केली. सुमारे सहा गाड्या पाणी मारुन दुपारी साडेचारच्या सुमारास आग आटोक्यात आली.
या आगीत प्लास्टिक कार्ड, कॉटन, प्लास्टिक साहित्य जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पूर्ण आग आटोक्यात येण्यास सुमारे दीड तास लागला. या आगीत सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाचे अच्युत दुधाळ यांनी सांगितले.