जळगाव : जळगावच्या चाळीसगाव शहरातील मिरची बाजाराला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. या बाजाराच्या बाजूलाच पेट्रोलपंप असल्याने एकच धावपळ उडाली. या आगीत बाजाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चाळीसगाव शहरातील नागद रोडवर मिरची बाजार आहे. या मिरची बाजाराला आज दुपारी भीषण आग लागली. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता. जो या आगीत जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या आगीत एक ट्रक देखील जळून खाक झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान आग लागलेल्या घटनाशेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करत आहे.