नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावर मंगळवारी (१६ एप्रिल) सकाळी आग लागली. या आगीमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या घटनेबाबत अग्निशमन विभागाच्या अधिका-याने सांगितले की, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने सकाळी ९:३५ पर्यंत आग आटोक्यात आणली. ही आग गृह मंत्रालयाच्या कार्यालयातील आयसी विभागात दुस-या मजल्यावर लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेत एसी, झेरॉक्स मशिन, काही संगणक आणि कागदपत्रांसह पंखेही जळून खाक झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. ज्या कार्यालयात ही आग लागली, ते आयकर विभागाशी संबंधित कार्यालय आहे. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते, परंतु अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते.