मुंबई : प्रतिनिधी
बॅग चेकिंगच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला गेले होते. यावेळी हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या. यामुळे उद्धव ठाकरे संतापले. या बॅग चेकिंगचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तसंच भाषणातही या मुद्द्यावरून महायुतीवर निशाणा साधला.
माझीही बॅग तपासली : अजित पवार
उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासण्याचा व्हीडिओ शेअर केल्यानंतर यावरून राजकारण तापलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा माझ्या पण बॅगा तपासल्या आहेत. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या होत्या. निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्यांच्या बॅगा पण तपासल्या होत्या. आमच्यासोबत पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासल्या पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले.
शरद पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी देखील बॅग तपासण्यावरून नाराजी व्यक्त केली. सत्तेचा वापर कसा करायचा आणि विरोधकांना त्रास देणे त्यांनी ठरवलेले आहे. सत्ताधा-यांचा एकंदरीत हाच दृष्टिकोन आहे त्यामुळे हे सहन करावे लागेल. त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते. याचा निवडणुकीवर फार मोठा परिणाम होईल असे काही नाही, असे शरद पवार म्हणाले.
अमोल कोल्हेंची बॅग तपासली
उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची देखील बॅग तपासली गेली. याचा व्हीडिओ अमोल कोल्हे यांनी शेअर केला. आज पुन्हा बॅग तपासली गेली. विधानसभा निवडणुकीदरम्यान दुस-यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे. पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधा-यांना सगळीकडे मोकळे रान असते हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे!, असे अमोल कोल्हे म्हणाले.