इंफाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात बुधवारी सकाळी संशयित कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात एक आयआरबी कमांडो शाहिद झाला आहे. तसेच या घटनेत एक अन्य कमांडो जखमी झाला आहे. या घटनेला दुजोरा देताना तेंगनौपाल जिल्हा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या गोळीबारीत एका आयआरबी कमांडोचा मृत्यू झाला असून आमची टीम अतिरेक्यांचा शोध घेत आहे.
या घटनेत शहीद झालेल्या जवानाचे नाव आयआरबी जवान वांगखेम सोमरजीत असे असून ते राज्य पोलीस कमांडोमध्ये कार्यरत होते. ते इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील मालोमचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या मोरे शहरात बुधवारी सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात गोळीबार झाला. या संशयित अतिरेक्यांनी मोरेहजवळील सुरक्षा चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, ज्यात एक पोलीस कमांडो ठार झाला. तर दुसरा कमांडो जखमी झाला आहे.
सध्या मोरे शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोरे शहरातील एका रहिवाशाने सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेकदा गोळीबाराचे आवाज ऐकू येतात. बुधवारी सकाळी त्यांना बराच वेळ गोळीबाराचे आवाजही ऐकू आले. तसेच मणिपूर पोलिसांच्या विशेष कमांडो पथकाने सोमवारी संध्याकाळी चकमकीनंतर दोन संशयित लोकांना अटक केली होती. मोरे शहराचे एसडीपीओ असलेले चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येत या दोघांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. एसडीपीओ आनंद कुमार यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संशयित अतिरेक्यांनी हत्या केली होती.