पुणे : प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद, आयोजित ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे २० ते २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्ष निलम शिर्के सामंत यांनी सांगितली .
मुलांसाठी कार्यरत असणा-या रंगमंचीय कलेचा, खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करीत असलेल्या परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर २८ शाखांच्या माध्यमातून होत आहे या शाखांचे कार्य व बालकलावंतांना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाध्यक्षपदी सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी आहेत.
संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होईल. नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले,अभिनेते सयाजी शिंदे,अभिनेते बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले,सविता मालपेकर,सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. संमेलन समारोप व पुरस्कार सोहळा होणार असून बालरंगभूमी परिषद पुरस्कार जेष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना देण्यात येणार आहे.
संमेलनानिमित्त बाल कलावंतांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विविध कलांचे, चित्ररथांचे प्रदर्शन केले जाणार आहे. संमेलनात नावाजलेले बालनाट्य, बालकलावंतांचे सर्वोत्कृष्ट लोककलेचे कार्यक्रम तसेच विविध दिव्यांग संस्थांच्या बालकलावंतांचे कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, एकपात्री, नाट्यछटा, जादूगार, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, पपेट शो, नाटुकल्या, ग्रिप्स थिएटर आदी कार्यक्रम होणार आहेत.