लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने १६ उमेदवारांची नावे जाहीर केली. डिंपल यादव मैनपुरीमधून, शफीकुर रहमान बारक संभलमधून आणि रविदास मेहरोत्रा लखनौमधून निवडणूक लढविणार आहेत. सपाच्या पहिल्या यादीत ११ ओबीसी, १ मुस्लिम, १ दलित, १ ठाकूर, १ टंडन आणि १ खत्री उमेदवारांचा समावेश आहे.
११ ओबीसी उमेदवारांपैकी ४ कुर्मी, ३ यादव, २ शाक्य, १ निषाद आणि १ पाल समाजाचा आहे. अयोध्या लोकसभेसाठी (सर्वसाधारण जागा) दलित प्रवर्गातील पासी उमेदवाराला सपाने तिकीट दिले आहे. एटा आणि फर्रुखाबादमध्ये पहिल्यांदाच यादव यांच्या जागी शाक्य समाजाच्या नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला ११ जागांची ऑफर दिली होती. अलीकडेच, उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी अंतर्गत सपा आणि आरएलडीची युती झाली होती, ज्या अंतर्गत सपा अध्यक्षांनी आरएलडीला ७ जागा देण्याची घोषणा केली होती. मात्र, या जागावाटपाबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उत्तरप्रदेशमध्ये युतीबाबत सस्पेंस निर्माण झाला होता. दरम्यान, आता अखिलेश यादव यांनी १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
ही घोषणा अशा वेळी आली आहे. जेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पक्ष बदलून एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया गटात फूट पडली आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणुका एकट्याने लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.