17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदेशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

उदय सामंतांची माहिती

मुंबई : देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौ-यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना बुधवारी मंजुरी दिली आहे. सागरी महाविद्यालयाला ५०० ते ६०० कोटी तसेच विधी महाविद्यालयाला २५ कोटी खर्च येणार आहे. त्यालाही तत्वत: मान्याता देण्यात आली आहे. समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीत आता संधी उपलब्ध झाली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मानाची बाब आहे. त्यासाठी ५० एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिका-यांनी दिले असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

कोकणचा विकास होणार
यासंदर्भातील घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात कोकण दौ-यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे करणे प्रस्तावित आहेत. या विकासाअंतर्गत विविध योजनांसह रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती.

शिवसंकल्पात होती घोषणा
शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली होती. दरम्यान, भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येईल. ज्यात समुद्र विज्ञानापासून समुद्राचा इतिहास, नियम, संशोधन आदी विषयांचा अभ्यास करता येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR