पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बारामतीमधून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, आतापर्यंत ४० उमेदवारी अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. तिस-या टप्प्यातील उमेंदवारी अर्ज भरण्याची मुदत १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांचा सामना सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. यामुळे नणंद-भावजयींच्या या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सुळे आणि पवार यांच्याव्यतिरिक्त ओबीसी बहुजन पक्षाकडून महेश भागवत हे निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरू शकतात. मात्र बारामतीत खरी लढत ही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. बहुजन समाज पार्टी आंबेडकर गटाच्या त्रिशला मिलिंद कांबळे यांनी हा अर्ज दाखल केला आहे.