22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयराहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर

राहुल गांधी यांना पहिला ‘ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार’ जाहीर

कोच्ची : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पहिला ‘ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमन चंडी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला असून राहुल गांधी याचे पहिले मानकरी ठरले आहेत. ‘ओमन चंडी फाऊंडेशन’ ने आज ओमन चंडी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या तीन दिवसांनंतर या पुरस्काराची घोषणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपये आणि प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते नेमम पुष्पराज यांनी बनवलेली मूर्ती दिली जाईल. फाउंडेशनने एका निवेदनात म्हटले की, राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांनी ‘भारत जोडो यात्रे’द्वारे लोकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधले. दरम्यान, पुरस्कार विजेत्या राहुल गांधींची निवड काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ ज्युरीने केली आहे.

कोण आहेत ओमन चंडी?
केरळचे १० वे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे गेल्या वर्षी १८ जुलै २०२३ रोजी बंगळुरुच्या चिन्मय मिशन रुग्णालयात निधन झाले. २००४-२००६ आणि २०११-२०१६ दरम्यान ओमन चंडी केरळचे मुख्यमंत्री होते. यासोबतच ते २००६ ते २०२१ दरम्यान केरळमध्ये विरोधी पक्षनेतेही होते. राज्यातील सर्वाधिक काळ आमदार राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. याशिवाय ओमन चंडी हे एकमेव भारतीय मुख्यमंत्री आहेत, ज्यांना संयुक्त राष्ट्राने सार्वजनिक सेवेसाठी सन्मानित केले होते.

२०१८ मध्ये काँग्रेसमध्ये सरचिटणीस बनले
राहुल गांधी यांनी ६ जून २०१८ रोजी ओमन चंडी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बनवले होते. याशिवाय त्यांना आंध्र प्रदेशचे प्रभारीही करण्यात आले. मात्र, त्यांच्या शेवटच्या काळात चंडी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य राहिले. चंडी यांचा राजकारणातील प्रवास खूप मोठा होता. चंडी १९६७-६९ पर्यंत केरळ विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. यासोबतच त्यांची १९७० मध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघातून ते ५ दशके आमदार म्हणून निवडून आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR