जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ७ जिल्ह्यांतील एकूण २४ विधानसभा जागांवर आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, मतदारांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा जागांवर एकूण २१९ उमेदवार रिंगणात आहेत. आज दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील १६ विधानसभा मतदारसंघात आज विस्थापित काश्मिरी पंडितांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक होत आहे. एकूण २३.२७ लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत आणि २१९ उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेली बिजबेहारा जागाही याच टप्प्यात आहे. येथे पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा प्रथमच निवडणूक लढवत आहे. मेहबूबा आणि त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
दरम्यान, मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. यामुळे विरोधकांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा जम्मू आणि काश्मीरला कलम ३७० परत बहाल करणे हा आहे. तर भाजपने कलम ३७० रद्द केल्यानंतर येथील दहशतवाद कमी झाला असा दावा केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पीडीपीने सर्वाधिक २८ तर भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मिळून येथे सरकार स्थापन केले. दरम्यान यावेळी पीडीपी स्वबळावर तर काँग्रेस आणि एनसीपीने आघाडी केली आहे.