35.9 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रप्रथम अजितदादा विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज द्या

प्रथम अजितदादा विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज द्या

डीजीसीएचा अंतिम अहवाल पुढच्या वर्षी द्या अमित मिटकरींना घातपाताचा संशय

पुणे : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या यंत्रणांनी आपला अहवाल पुढच्या वर्षी द्यावा, पण प्रथम अजित पवार विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे.

अजित पवार यांचा गत २८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमानात अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांनी असा दावा केला आहे. त्यात प्रामुख्याने रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करून तपास यंत्रणांवरील दबाव वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांचा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी आज एका पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादा विमान दुर्घटना प्रकरणात महाराष्ट्रातील जनतेला शंका असणारे कटाचे मुख्य सूत्रधार, सुमित कपूर, साहिल मदन, यश व यांचा बाप श्ङ सिंग कुठाय तेही नंतर सांगा? डीजीसीएचा अंतिम अहवाल व ब्लैक बॉक्स डेटा वाटल्यास पुढच्या वर्षी द्या निदान दादा विमानात बसतानाचा सीसीटीव्ही फुटेज तर महाराष्ट्रासमोर येऊ द्या. मिटकरी यांनी हे ट्विट मुंबई पोलिस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयलाही टॅग केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणा-या सर्वच तपास संस्था अपयशी ठरल्याचा दावा केला आहे.

प्रस्तुत फोटोत नमूद करण्यात आले आहे की, २८ जानेवारीनंतर या एक महिना ११ दिवसांत अजितदांदाच्या अपघाताविषयी एकही ठोस पुरावा न देऊ शकलेले फेल इन्व्हेस्टिगेशन कंपनी. एफआयआर न घेऊ शकलेले फेल पोलिस. व्ही के सिंगला सपोर्ट करणारी फेल सीआयडी. आंतरराष्ट्रीय चौकशी नाकारणारे फेल सरकार. सीसीटीव्ही फुटेज नाही. ब्लॅक बॉक्स जळाला. ऑल इन्व्हेस्टिगेशन आर आर फेल हेअर. जनतेचा आवाज दाबणारे सगळे फेल. शेमफूल प्रोसेस.

विधिमंडळात चर्चा होत नसल्यावर नाराजी
उल्लेखनीय बाब म्हणजे अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघातावर विधिमंडळात चर्चा करण्यात होणा-या दिरंगाईवरही नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला, याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र हा विषय अद्याप सभागृहात चर्चेसाठी आला नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून हा विषय मांडला जाऊ शकतो. त्या चर्चेतूनच सत्य समोर येईल आणि ते नोंदवहीतही येईल. मात्र पहिल्याच अधिवेशनात या विषयावर चर्चा न होणे खेदजनक आहे, असे ते म्हणाले होते.