19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन

छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन

४०० हून अधिक शिक्षकांचा संमेलनाला सहभाग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी डॉ. हबीब भंडारे, संमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षकांच्या साहित्य प्रतिभेला तसेच शिक्षकांच्या कलेला वाव मिळावा, तसेच, शिक्षकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषा, कला विकासात तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान फार मोलाचे आहे. याच शिक्षकांच्या साहित्य प्रतिभेला वाव मिळावा असा या संमेलनाचा हेतू आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षकांनी शिक्षकांसाठीच भव्य स्वरूपात भरवले जात असलेले हे जिल्ह्यातील पहिलेच शिक्षक साहित्य संमेलन ठरणार असून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या आणि प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये येथे कार्यरत असणारे शिक्षक यात सहभागी होणार आहेत. या संमेलनात साधारण ४०० हून अधिक शिक्षक सहभागी होणार आहेत.

या शिक्षक साहित्य संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद आणि चित्रप्रदर्शन यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ आणि रमेश ठाकूर यांनी दिली.

शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हे संमेलन अग्रसेन विद्यामंदिर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होईल, तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या हस्ते ४० हून अधिक शिक्षक कलावंतांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत आणि रवींद्र मार्डिया यांची प्रमुख उपस्थिती असेल. याच कार्यक्रमात १३८ हून अधिक शिक्षक कवींच्या कवितांचा समावेश असलेला ‘काव्यदिंडी’ हा संपादित कवितासंग्रह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे. त्यानंतर भव्य कविसंमेलन ज्येष्ठ कवी प्रा. श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून यात ५६ हून अधिक शिक्षक कवी सहभागी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR