परभणी : जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील प्रकल्पग्रस्त व भूमिहीन मच्छीमारांनी येलदरी जलाशयात मासेमारी करण्यापासून रोकण्यात येत असल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि.१० जून रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात काही अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मच्छीमारांनी घेतलेल्या या आक्रमक भुमिकेमुळे कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. यावेळी पोलिस व प्रशासकीय अधिका-यांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
सावंगी म्हाळसा येथील मच्छीमारांनी येलदरी जलाशयात मत्स्य व्यवसाय परवाने द्यावेत. येलदरी जलाशयात मासेमारी करण्यापासून रोकण्यात येत असल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. या बाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करून देखील यावर ठोस निर्णय घेण्याबाबत दिरंगाई होत असल्याने मच्छीमारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक भुमिका घेत सामुहीक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यापूर्वी संबंधित विभागाकडून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
















