22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रजायकवाडीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छिमारांचा विरोध

जायकवाडीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छिमारांचा विरोध

पहाटे पाच वाजताच हजारो आंदोलक धरणावर धडकले; प्रशासनाची धावपळ

छ. संभाजीनगर : जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात हजारोंच्या संख्येने मच्छिमार आज आपल्या कुटुंबासह पैठणच्या जायकवाडी धरणावर एकत्र आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दुपारी १२ वाजता आंदोलनाचा वेळ असताना पहाटे पाच वाजताच हजारो आंदोलक धरणावर जाऊन धडकले असून, याबाबत प्रशासनाला देखील कोणतीही कल्पना नव्हती. जायकवाडी धरणावर होणारा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच आता पोलिस आंदोलनस्थळी दाखल झाले असून, आंदोलकांना धरणावरून निघून जाण्याची विनंती केली जात आहे.

मराठवाड्याची तहान भागविणारे आणि सर्वांत मोठे मातीचे धरण म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरणावरील १५ हजार एकरात तरंगता सौर प्रकल्प करण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे देखील बोलले जाते. मात्र, याच प्रकल्पाला कहार भोई आणि भिल्ल समाजाचा मोठा विरोध होत आहे. त्यामुळे आज (७ फेब्रुवारी) रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मच्छिमारांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. दुपारी १२ वाजता हे आंदोलन होणार होते. मात्र, आंदोलकांना पोलिसांकडून रोखले जाण्याची शक्यता लक्षात घेता आंदोलकांनी गनिमी कावा करत पहाटे ५ वाजताच जायकवाडी धरण गाठले. लहान मुलं, महिला, वृद्ध असे हजारोंच्या संख्येने मच्छिमार जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले आहेत.

प्रशासनाची धावपळ….
आज जायकवाडी धरणावर मच्छिमार आंदोलन करणार असल्याची माहिती प्रशासनाकडे होती. मात्र, दुपारी १२ वाजता हे आंदोलन होणार असल्याने पोलिसांकडून त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. पोलिसांचा विशेष बंदोबस्त देखील मागवण्यात आला होता. मात्र, पोलिसांना थोडेही खबर न लागू देता रात्रीच आंदोलकांनी नियोजन केले. तसेच पहाटे ५ वाजता जायकवाडी धरणावर दाखल होण्याच्या सूचना गुप्तपणे सर्व आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे ठरल्यानुसार हजारो आंदोलक पहाटेच धरणावर दाखल झाले. मात्र, हजारो आंदोलक जायकवाडी धरणावर दाखल झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR