23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयतिबेटमधील हिमनद्या वितळल्या, बाहेर आले हजारो वर्षांपूर्वीचे विषाणू...

तिबेटमधील हिमनद्या वितळल्या, बाहेर आले हजारो वर्षांपूर्वीचे विषाणू…

ल्हासा : एकीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भीती कमी झालेली नसतानाच, भारतासमोर आणखी एक मोठे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. तिबेटमधील काही हिमनद्या वितळू लागल्या आहेत. यामुळे हजारो वर्षांपूर्वी बर्फात अडकलेले विषाणू आता समोर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी रशियामध्ये असा ४० हजार वर्षांपूर्वीचा विषाणू मिळाला होता. मात्र, आता भारतापासून अगदी जवळ असा विषाणू मिळाल्यामुळे शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

तिबेटच्या पठाराजवळ असणा-या गुलिया आइस कॅँपजवळ शास्त्रज्ञांना १५ हजार वर्षांपूर्वीचे विषाणू आढळले आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी एकाच नव्हे तर अनेक प्रकारचे विषाणू मिळाले आहेत. यातील कित्येक विषाणू अजूनही जिवंत असल्याची माहिती ओहियो स्टेट युनिवर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट झी-पिंग झॉन्ग यांनी दिली.

३३ विषाणू, २८ अज्ञात..
समुद्रसपाटीपासून सुमारे २२ हजार फूट उंचीवर हे विषाणू मिळाले आहेत. शास्त्रज्ञांना याठिकाणी ३३ प्रकारचे विषाणू मिळाले. यातील २८ विषाणूंबाबत वैज्ञानिकांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. म्हणजेच या विषाणूंचे संक्रमण झाल्यास त्यावर कोणतेही औषध उपलब्ध नाही.

ओहियो विद्यापीठातील दुसरे वैज्ञानिक मॅथ्यू सुलिवन यांनी म्हटले, की हे विषाणू अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही तग धरून राहिले आहेत. हजारो वर्षे बर्फाखाली दबले जाऊनही त्यांच्यावर कोणता परिणाम झालेला नाही. कोणत्याही प्रकारचे वातावरण या विषाणूंवर परिणाम करू शकत नाही, त्यामुळे यांवर कशाचाच परिणाम होत नाही. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

बॅक्टेरियाच्या प्रजाती
गेल्या वर्षीदेखील तिबेटच्या हिमनदीमधून सुमारे १,००० प्रकारचे बॅक्टेरिया मिळाले होते. या हिमनद्या वितळल्या तर त्याचे पाणी भारत आणि चीनच्या नद्यांमध्ये मिसळणार आहे. हे बॅक्टेरिया मिश्रित पाणी प्यायल्याने विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे या हिमनद्या वितळण्याचा वेगही वाढला आहे. भारत, चीन आणि म्यानमार अशा देशांसाठी हा भविष्यात धोका ठरू शकतो असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR