नवी दिल्ली : नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पाच सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना वेगवेगळ्या कारणांमुळे दंड ठोठावला आहे. तसेच नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वच बँकांवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. ज्या बँकांवर आरबीआयने कारवाई केली त्यात इंदापूर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, द पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जनकल्याण को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.
इंदापूर सहकारी बँक आणि पुणे बँकेला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून ठेव खाते आणि किमान शिल्लक देखभाल या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईस्थित जनकल्याण को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने क्रेडिट माहितीच्या नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सातारा येथील पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ठेवी खात्यांची पुरेशी माहिती न ठेवल्याने पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर कारवाई करण्यात आली. आरबीआयने बँकेला एक लाख रुपयांचा संपूर्ण दंड ठोठावला. पुणे महानगरपालिका सर्व्हंट्स कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेला निष्क्रिय खात्यांबाबत योग्य माहिती न दिल्याने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.