नानयांग : वृत्तसंस्था
चीनमध्ये अचानक पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. केवळ २४ तासांतच वर्षभरात होतो तेवढा पाऊस झाला. यामुळे चीनमधील ३१ नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे.
नानयांग शहरात दाफेंगयिंगमध्ये एकाच दिवसात ६०६.७ मिमी (२४ इंच) पाऊस नोंदवला गेला. वर्षाचा विचार करता या भागात सरासरी ८०० मिमी एवढा पाऊस पडतो. पावसाने हेनान, शेडोंग आणि अनहुई प्रांतात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
चीनमधील ‘सीजीटीएन’च्या वृत्तानुसार, हेनान प्रांतातील नानयांगच्या डेंगझोऊ शहरात पाणी धोकादायक पातळीवर पोहोचले होते. वाढत्या पाणीपातळीमुळे अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बचाव पथकाने घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. हवामान विभागाच्या इशा-यानंतर, बीज्ािंगसह अनेक शहरांतील ट्रेन बंद केल्या आहेत. वायव्य प्रांतातील गांसूमधील कांग काउंटीनेही पावसाचा रेड अलर्ट जारी केला.
आशिया खंडात पावसाचा सर्वाधिक फटका चीनला बसला. चीनमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले. चीनमधील अनेक धरणे भरली आहेत. एवढेच नाही तर, चीनने सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस डॅमचे दरवाजेही उघडले आहेत. याशिवाय, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातही जबरदस्त पाऊस झाला आहे.