बंगळुरू : फटाक्यांच्या धुरामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा रविवारी संध्याकाळी विस्कळीत झाली. धुरामुळे धावपट्टीवर दृश्यमानता कमी झाल्याने २६ विमानांच्या उड्डाण व आगमनावर परिणाम झाला. रायपूरहून येणारे इंडिगोचे एक विमान बंगळुरूकडे वळवावे लागले. संध्याकाळी चेन्नई आणि उपनगरांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण वाढले. रात्री १० नंतरही अनेक भागांत फटाके फोडणे सुरूच होते. याचा विमानसेवेवर परिणाम झाला.
ईटीव्ही भारतने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई विमानतळाच्या परिसरातील मीनाम्बक्कमसारख्या निवासी भागांत परिस्थिती अधिक चिंताजनक होती. तिथे सतत फटाके फोडल्यामुळे निर्माण झालेला धूर धावपट्टीच्या दिशेने आल्याने दृश्यमानता कमी झाली. यामुळे कोलकाता, दिल्ली, पुणे, श्रीलंका, बँकॉक, तिरुवनंतपुरम, सिंगापूर, रायपूर, सिलिगुडी, तिरुचिरापल्ली आणि क्वालालंपूर येथून येणारी एकूण ११ विमाने प्रभावित झाली. नंतर दृश्यमानता सुधारल्यावर १० विमाने चेन्नई विमानतळावर उतरू शकली, परंतु १५६ प्रवाशांना घेऊन येणारे इंडिगोचे एक विमान बराच वेळ आकाशात घिरट्या घातल्यानंतर बंगळुरूकडे वळवण्यात आले.
विमानतळावरून उड्डाण घेणा-या विमानांनाही या धुराचा फटका बसला. कोलकाता, तिरुवनंतपुरम, दिल्ली, पुणे, तिरुचिरापल्ली, श्रीलंका, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर, हाँगकाँग आणि अबू धाबीला जाणारी १५ विमाने विलंबाने रवाना झाली.
















