28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयचेन्नईत पूरसदृश परिस्थिती; ३ जणांचा मृत्यू

चेन्नईत पूरसदृश परिस्थिती; ३ जणांचा मृत्यू

पावसामुळे अनेक भागात पाणी साचले

चेन्नई : बंगालच्या उपसागरातून २ डिसेंबर रोजी उद्भवलेले मिचॉन्ग चक्रीवादळ ५ डिसेंबरच्या मध्यरात्री आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये वादळाचा प्रभाव जाणवेल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. या काळात ९० ते ११० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान, चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. चेन्नईमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे हे चौथे आणि २०२३ मध्ये हिंदी महासागरातील सहावे चक्रीवादळ आहे. आयएमडीने सांगितले की, सध्या ‘मिचॉन्ग’ वादळ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत ते दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडू किनार्‍यामार्गे पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राज्य यंत्रणा सज्ज आहे. जनतेने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे. मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनी घरात राहावे.

७०-८० वर्षांत पहिल्यांदाच असा पाऊस
चेन्नईमध्ये रविवारपासून सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. काही भागात २० ते २२ सेंटीमीटर पाऊस झाला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई शहरात ७०-८० वर्षांत पहिल्यांदाच असा पाऊस झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता तामिळनाडूमध्ये सोमवार आणि मंगळवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या ९ टीम आणि एडीआरएफच्या १४ टीम इथे तैनात करण्यात आल्या आहेत.

२०४ ट्रेन आणि ७० उड्डाणे रद्द
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्यामुळे चेन्नई विमानतळावरील कामकाज बंद आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे. बाहेरून येणारी ३५ उड्डाणे बेंगळुरूकडे वळवण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत २०४ ट्रेन आणि ७० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

‘या’ राज्यांना धोका
तामिळनाडूसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरीला मिचॉन्ग चक्रीवादळाचा धोका आहे. ओडिशातील ५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफच्या १२ तुकड्या आंध्र प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. पुद्दुचेरीमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR