पुणे : प्रतिनिधी : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थितीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी काढण्यात आली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.
मोरया गोसावी मंदिरा पासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोचली. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,
नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.