सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयाकडे अडीचशे तक्रारी प्राप्त झाल्या असून तक्रारी ज्या विभागाशी संबंधित आहेत, त्या विभाग प्रमुखांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या सहीने नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे पत्र संबंधित विभाग प्रमुखांना पाठवले जात आहे. अडीचशेंपैकी ४१ तक्रारी तत्काळ सुटल्या असून ६५ तक्रारींवर अंतरिम कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २१३ तक्रारी प्रलंबित आहेत.
नियोजन भवनच्या वरच्या मजल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संपर्क कार्यालय आहेत. या ठिकाणी निवेदने स्वीकारण्याची सोय आहे. पालकमंत्र्यांचा दौरा होण्यापूर्वी किंवा दौऱ्यात अनेक नागरिक पालकमंत्र्यांना भेटून निवेदने देतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काळात निवेदने देण्याचे प्रमाण वाढले आहे.
सर्वाधिक तक्रारी महसूल विभागाशी संबंधित आहेत. महसूल विभागाबाबत ९९ निवेदने प्राप्त झाली असून यातील १६ प्रकरणांवर अंतिम कार्यवाही झाली आहे. ३३ प्रकरणांवर अंतरिम कार्यवाही सुरू असून उर्वरित ८३ प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद संबंधित ४६ तक्रारी आल्या असून ६ प्रकरणांवर अंतिम कार्यवाही झाली असून सहा प्रकरणांवर अंतरिम कार्यवाही झाली आहे. ४० तक्रारी प्रलंबित आहेत.