नागपूर : प्रतिनिधी
मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. मला ४ दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी ७००-८०० कॉल आले. फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असे वक्तव्य केले. यावर दमानिया यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोर्चे काढण्याचा
सगळ््यांना अधिकार आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलिस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत. काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हफ्ते वसुली करतात, असा सगळ््यांवर आम्ही जरब बसवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य कारवाई सुरु आहे. अंजली दमानिया यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, पोलिस यावर निश्चित कारवाई करतील, असे म्हटले.
आतापर्यंत चकाट्या पिटत होतो का?
यावर पलटवार करताना दमानिया यांनी मुख्यमंत्री आम्हाला आता म्हणत आहेत पोलिसांकडे जा, अरे आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी डीजींना मॅसेज केला, मुख्यमंत्री फडणवीस तुम्हालाही मॅसेज केला. पोलिसांना सगळे डिटेल्स दिले आहेत. मात्र तरीही कारवाई केली नाही, असे दमानिया म्हणाल्या.