नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय चेहरा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी १९ राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशात ‘एनडीए’ सरकारचे राज्य शासन आहे. २१ पैकी सहा राज्यात ‘एनडीए’च्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर १५ राज्यात भाजपाच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘एनडीए’कडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता हाती आली आहे.
‘एनडीए’च्याजवळ आता देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी (उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडु) तीन राज्यात सरकार आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपाचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे. बिहारमध्ये भाजपाचे मित्र पक्ष जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती सत्ता आहे. ईशान्येकडील ७ पैकी ६ राज्यांवर ‘एनडीए’चा कब्जा आहे. डोंगराळ प्रदेश असलेल्या तीन राज्यांपैकी (जम्मू-कश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल ) एका राज्यात उत्तराखंडमध्ये भाजपाची सत्ता आहे. जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला तर हिमाचल प्रदेशात कांग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील भाजपचे सरकार आहे. २०२२ मध्ये गुजरात आणि २०२३ मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपाचा विजय झाला होता. महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये भाजपाप्रणीत एनडीएचा विजय झाला.
याच प्रकारे उत्तर भारतात बिहार आणि उत्तर प्रदेशात ‘एनडीए’चा कब्जा आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचे सरकार आहे. तर दक्षिण भारतातील पाच पैकी चार राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आहे. केरळ, तेलंगाणा, कर्नाटक आणि तामिळनाडुत इंडिया आघाडीचे सरकार आहे तर आंध्रप्रदेशात ‘एनडीए’चे सरकार आहे.
देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या आसपास आहे. दिल्लीच्या विजयानंतर ‘एनडीए’चे शासन ९२ कोटी लोकांवर आहे. १० कोटीहून अधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेश (२४ कोटी ), महाराष्ट्र (१२ कोटी ) आणि बिहार मध्ये (१२ कोटी ) ‘एनडीए’चे राज्य आहे. १० कोटी किंवा त्याहून जादा लोकसंख्या असलेल्या कोणत्याही मोठ्या राज्यात इंडिया आघाडीचे सरकार नाही.
पहिल्यांदाच २१ राज्यात ‘एनडीए’!
२०१८ च्या मध्यात भाजपा सत्तेच्या सारीपाटावर आघाडीवर होती. त्यावेळी २० राज्यात भाजपाचे राज्य होते. यात पूर्वोंत्तर येथील सर्व ७ राज्यांशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या सरकारचा समावेश होता. त्यानंतर भाजपाचा आलेख घसरला. सात वर्षांनंतर आता भाजपाने आपलाच २० राज्यांचा विक्रम मोडीत काढत २१ राज्यात सत्ता मिळविली आहे.