25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयदक्षिणेचे द्वार कुणासाठी खुले होणार?

दक्षिणेचे द्वार कुणासाठी खुले होणार?

लोकसभा निवडणूक; तेलंगणात पुन्हा केसीआर? भाजप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच!

हैदराबाद : वृत्तसंस्था
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये तीव्र तिरंगी स्पर्धा पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे अस्तित्व टिकवण्यासाठी निकराची लढाई लढत आहेत. तेलंगणात सलग १० वर्षे राज्य केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचे पतन झाले आणि काँग्रेस पक्ष सत्तेत विराजमान झाला. लोकसभा नवडणुकीतही केसीआर यांच्यासमोरील आव्हाने कमी होताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मित्रपक्षांच्या मदतीने दक्षिण दरवाजा म्हणजेच तेलंगणा काबीज करण्याचा पुन्हा एकदा घाट घातला आहे. दक्षिणेकडील सर्व राज्यांतील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. आता ४ जूनच्या निकाला दिवशीच कळणार ‘दक्षिणेचे द्वार कुणासाठी खुले होणार?’

दरम्यान, २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि आंध्र प्रदेश लोकसभेच्या एकूण ४२ जागांची वाटणी झाली. आंध्र प्रदेशच्या वाट्याला २५ तर तेलंगणाच्या वाट्याला १७ जागा आल्या. २०१४ मध्ये नव्या तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून के. सी. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची वर्णी लागली. तेव्हापासून आजवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना भारत राष्ट्र समिती (बीआरएस) शी म्हणजेच के. सी. आर. यांच्या पक्षाशी संघर्ष करावा लागतोय शिवाय ‘एमआयएम’ची डोकेदुखी मागे आहेच.

तेलंगणातील एकूण मतदारसंघांची संख्या १७ आहे. आदिलाबाद, भोंगीर, चेवेल्ला, हैदराबाद, करीमनगर, खम्मम, महबूबाबाद, महबूबनगर, मलकाजगिरी, मेडक, नागरकुर्नूल, नलगोंडा, निजामाबाद, पेड्डापल्ले, वारदाबाद स., जहिराबाद यांचा समावेश आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघी एक तर काँग्रेसला केवळ ०२ जागा जिंकता आल्या. २०१९ मध्ये भाजपने सर्वच्या सर्व जागा लढवल्या पण हाताशी आल्या अवघ्या ४ जागा. काँग्रेसच्या पदरात केवळ ३ जागा पडल्या. ‘एमआयएम’च्या असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र आपला हैदराबादचा गड राखण्यात यश मिळवले. २०२४ मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी सरळ सरळ लढत पाहायला मिळाली. दोन्ही पक्षांनी सर्वच जागा लढविल्या आहेत. त्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये सर्वच जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच आहे. तेलंगणात एमआयएमनेही जोरदार प्रचार केला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने केसीआर यांची चांगलीच कोंडी केली आहे. २०१९ मध्ये बीआरएसने राज्यातील सतरापैकी नऊ जागा जिंकल्या होत्या; मात्र यंदा एवढ्या तरी जागा जिंकण्यात यश येईल का, असा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाने केसीआर यांची राजकीय वाटचाल खडतर झाली आहे. त्यांच्या पक्षाला ८८ जागांवरून थेट ३९ जागांवर घेऊन आली. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या आपल्या पक्षाला २०२८ च्या विधानसभेत पुन्हा एकदा सत्तेत आणायचे असेल तर के. सी. आर. यांना २०२४ च्या लोकसभेत आपल्या गुलाबी रंगाची ताकद दाखवावी लागेल. एकूणच काय तर तेलंगणात ‘बीआरएस’ कमबॅक करण्यासाठी तडफडतोय, तर तिकडे नव्या राज्यातील नवनवीन खेळ खेळता खेळता भाजप किंवा काँग्रेस पक्ष सत्तेचा मेळ बसवण्यासाठी धडपडतोय.

केसीआर यांची अस्तित्वाची लढाई
गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसने तेलंगणात सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या होत्या. ‘केसीआर’ आता राज्यातील सत्तेत नाहीत. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसने जागांची संख्या वाढविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभा निवडणूक केसीआर यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.

काँग्रेस, भाजपचा नियोजनपूर्ण प्रचार
विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांनीही केसीआर भयभीत झाले आहेत. दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह केसीआर कन्या के. कविताही अडकल्या आहेत. या प्रकरणी सध्या त्या तुरुंगात आहे. एकीकडे आम आदमी पक्षांकडून केजरीवाल यांच्या अटकेवरून रान उठविले जात असताना आणि दिल्लीत प्रचारात सर्व पोस्टर्सवर केजरीवालांचीच छाप दिसून येत असताना तेलंगणात मात्र तसे चित्र दिसत नाही. केसीआर हे निवडणूक सभांत मुलीच्या अटकेचा मुद्दा प्रभावीपणे मांडताना दिसून आले नाहीत. या उलट काँग्रेस-भाजपने नियोजनपूर्ण प्रचार करत मतदारांना वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

मुस्लिम मतदान काँग्रेसच्या बाजूने
जमियत उलेमा हिंद, युनायटेड मुस्लिम फोरम आणि तहरीक मुस्लिम शब्बान या मुस्लिम संघटनांनी तेलंगणात काँग्रेस आणि एमआयएमला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. बीआरएसला दिलेले मत वाया जाईल आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणे ही काळाची गरज आहे. भाजप सत्तेवर आल्यास आरक्षण हटवेल आणि संविधान बदलेल. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजयासाठी मतदान करा, हैदराबाद मतदारसंघात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि तेलंगणातील उर्वरित १६ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करून जातीयवादी शक्तींचा पराभव करण्याचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR