वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत शिकणा-या शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे स्वत:हून देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हा मेल पाठवला आहे. ज्यांचा एफ-१ व्हिसा अर्थात विद्यार्थी व्हिसा कॅम्पस सक्रियतेमुळे रद्द झाला, असे विद्यार्थी वैध इमिग्रेशन स्टेटसशिवाय यूएसमध्ये राहिले तर त्यांना दंड, ताब्यात घेणे आणि हद्दपारीचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही ट्रम्प प्रशासनाने दिला. एवढेच नव्हे तर ज्यांनी कोणत्याही प्रकारची देशविरोधी पोस्ट शेअर केली किंवा लाईक केली, त्यांनाही नोटीस बजावली जात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी सांगितले की, सध्या अशा विद्यार्थ्यांची संख्या ३०० पेक्षा जास्त असू शकते. आपल्या मातीत कोण येणार आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार जगातील प्रत्येक देशाला आहे. रुबिओ यांच्या कार्यालयाने अलीकडेच कॅच अँड रिव्होक लाँच केले आहे, जे हमास किंवा इतर नियुक्त दहशतवादी संघटनांना समर्थन करणा-या विद्यार्थ्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांचे व्हिसा रद्द करण्यासाठीचे अॅप आहे. राज्य विभाग नवीन विद्यार्थ्यांच्या अर्जांचीही तपासणी करत आहे.
एफ (शैक्षणिक अभ्यास व्हिसा), एम (प्रोफेशनल स्टडी व्हिसा) किंवा जे (एक्सचेंज व्हिसा) सारख्या अर्जाच्या कोणत्याही श्रेणीमध्ये जर अर्जदाराने देशविरोधी कृतीला पाठिंबा दिल्याचे आढळले तर अर्जदाराला यूएसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ईमेल विद्यार्थ्यांना अॅप वापरून आत्मपरीक्षण करण्यास सांगते. हे अॅप ट्रम्प प्रशासनाने १० मार्च रोजी लाँच केले. मेलमध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की, तुमचा व्हिसा जारी केल्यानंतर इतर माहिती प्राप्त झाली आहे, त्यानंतर तुमचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. व्हिसा एक्स्पायरी डेटही ई-मेलमध्ये लिहिली आहे. यानंतरही अमेरिकेत राहिल्यास त्यांना दंड, नजरकैद आणि हद्दपारीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे.
…तर यूएस व्हिसासाठी विद्यार्थी अपात्र ठरणार
भविष्यात यूएस व्हिसासाठी तुम्ही अपात्रही होऊ शकता. निर्वासित केलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पाठवले जाऊ शकते. तसेच जर निर्वासित विद्यार्थ्यांना भविष्यात यूएसला परत यायचे असेल तर त्यांना नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर त्यांच्या पात्रतेचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. देश सोडण्याची संपूर्ण प्रक्रियाही विद्यार्थ्यांना ई-मेलमध्ये समजावून सांगण्यात आली आहे.