बार्शी : विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून मार्गक्रमण करत बार्शी तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या वाघाचे सलग दुस-या दिवशीही ढेंबरेवाडी तलावाजवळ दर्शन झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग पूर्णपणे सतर्क मोडवर आलेला आहे. भागात दिवसाची आणि रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. सोबतच वाघाच्या हालचालीवर ही लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती बार्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील पांगरी भागातील पांढरी घोळवेवाडी, ढेंबरेवाडी चिंचोली या परिसरात वनक्षेत्र जे मोठ्या प्रमाणात आहे. लागूनच येडशीचे अभयारण्यदेखील आहे, त्यामुळे वाघाने या भागातच आपला मुक्काम स्थिर केला आहे. मंगळवारी दुपारी तसेच बुधवारी तलावात पाणी पिण्यासाठी हा वाघ आला असल्याचे वनखात्याच्या ट्रॅक कॅमे-यात दिसून आले आहे. त्या ठिकाणाहून वाघ पुढे गेल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी निरीक्षण नोंदवत आहेत. वाघ पुढे कुठल्या मार्गाने गेला, त्याचे ठसे आढळून येतात का, तसेच कुठे त्याची विष्ठा दिसून येते का हेदेखील तपासले जात आहे.
बार्शी तालुक्यातील चारे येथील जगदाळे प्लॉटमधील वस्तीत बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हरिश्चंद्र जगदाळे हे शेतात ट्रॅक्टरमध्ये शेणखत घेऊन जात होते. ट्रॅक्टरच्या लाईटच्या प्रकाशात बिबट्या दिसल्याने ते घाबरून गेले. तो पुन्हा माघारी वळून बोरगावकडे निघून गेल्याचे दिसून आले.
बार्शी तालुक्यातील मागील २० ते २५ दिवसांपासून बिबट्या व वाघ यांचा वावर सुरू असून, आतापर्यंत अनेक जनावरांना ठार व जखमी केलेले आहे. बार्शी तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या बालाघाट डोंगररांगा व वनक्षेत्र यामध्ये वाघ दिसून आलेला आहे. बिबट्याच्या व वाघाच्या वावरामुळे पशुपालक व शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच सध्या शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेताकडे जात असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करावी, अशा मागणीचे पत्र आमदार दिलीप सोपल यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. तसेच गणेश नाईक यांना थेट कॉल करून याबाबत माहितीही दिली आहे.