नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान हिंसाचार भडकवल्याच्या आरोपातून दिल्ली न्यायालयाने गुरूवार दि. २२ जानेवारी रोजी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाचा हा निकाल अनेक दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित कुटुंबांसाठी आणि वाचलेल्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाचा निकाल पश्चिम दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या दंगल आणि जातीय हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष न्यायाधीश दिग विनय सिंह यांनी सज्जन कुमार यांना सर्व आरोपांतून मुक्त केले. न्यायालयाने सध्या संक्षिप्त मौखिक आदेश दिला असून, सविस्तर निकालपत्र नंतर प्रसिद्ध केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
सज्जन कुमारांवर कोणते आरोप होते?
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. यानंतर नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात सज्जन कुमार यांनी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप होता. त्यांच्या चिथावणीमुळेच पश्चिम दिल्लीतील शीख समुदायावर हल्ला करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. त्यांच्यावर पहिला गुन्हा १ नोव्हेंबर १९८४ रोजी जनकपुरी येथे सोहन सिंग आणि त्यांचे जावई अवतार सिंग यांच्या हत्येप्रकरणी होता. तर दुसरा गुन्हा हा विकासपुरी येथे गुरचरण सिंग यांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणी होता.
कनिष्ठ न्यायालयाकडून आरोप निश्चित
ऑगस्ट २०२३ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने कुमार यांच्यावर दंगल घडवणे आणि दोन समुदायांमध्ये शत्रुत्व पसरवल्याप्रकरणी आरोप निश्चित केले होते. मात्र, त्याच वेळी त्यांच्यावरील ‘खून’ आणि ‘गुन्हेगारी कट रचणे’ यांसारखे गंभीर आरोप काढून टाकण्यात आले होते. विशेष तपास पथकाने फेब्रुवारी २०१५ मध्ये नोंदवलेल्या दोन एफआयआर यांच्या आधारे हा खटला चालवण्यात आला.
तुरुंगवास कायम राहणार
शीख दंगल १९८४ च्या विशिष्ट प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली तरी सज्जन कुमार यांचा तुरुंगवास संपलेला नाही. गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी दंगलीच्या दुस-या एका प्रकरणात (सरस्वती विहार येथील जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग यांची हत्या) त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या ते याच शिक्षेअंतर्गत तुरुंगात आहेत.

