चंदिगड : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या पंचकुला येथील घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. युवराजच्या घरातून ७५ हजार रुपये आणि दागिन्यांची चोरी झाली. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी घरातील नोकर आणि मोलकरणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शबनम सिंग यांनी सांगितले की, ‘सप्टेंबर २०२३ मध्ये त्या त्यांच्या गुरुग्राम येथील घरी राहायला गेल्या होत्या. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी त्या पंचकुला येथील घरी परतल्या, तेव्हा त्यांना पहिल्या मजल्यावरील खोलीच्या कपाटातून काही दागिने आणि सुमारे ७५ हजार रुपये रोख गायब झाल्याचे आढळले. यानंतर त्यांनी इकडे-तिकडे चौकशी करत शोध घेतला, मात्र काहीही सापडले नाही.’
शबनम सिंग यांनी पोलिसांना सांगितले की, घरातील मोलकरीण ललिता देवी आणि नोकर सालिंदर दास यांनी २०२३ मध्ये दिवाळीच्या आसपास नोकरी सोडली होती. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेतला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.