पाटना : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारमध्ये भारतीय पोलिस सेवेत एकेकाळी कर्तव्य बजावणा-या शिवदीप लांडे यांनी अखेर राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हिंद सेना पक्षाची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वीच लांडे यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवदीप लांडे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून बिहारच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचे (शिंदे) नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई असलेले शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जन्मले होते. २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले लांडे यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते बिहारचे दंबग पोलिस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.
१९ सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी अचानक पोलिस सेवेतून निवृत्ती घेतली होती. राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यावरून ते राजकारणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. मी बिहारमध्ये १८ वर्ष काम करून सेवा दिली. बिहार माझे कुटुंब आहे. जर माझ्याकडून नकळत काही चुकले असेल तर बिहारच्या जनतेने मला माफ करावे. आज मी पोलिस दलाचा राजीनामा देत आहे. पण बिहारसाठी यापुढेही काम करत राहिल अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर लिहिली होती.
पत्रकार परिषदेत बोलताना शिवदीप लांडे म्हणाले की, मी नोकरीची सुरुवात जय हिंद बोलून केली होती. त्याच उत्साहात आता राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. युवकांसाठी युवकांच्या माध्यमातून काम करणारा पक्ष, अशी आमच्या पक्षाची ओळख असेल. प्रत्येक युवकाला आज बदल हवा आहे. पण हा बदल घडविणार कोण? असा प्रश्न आहे. आम्ही युवकांसाठी एक माध्यम बनू इच्छितो.