सोलापूर : दुहेरी जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करुन शहराला दररोज पाणीपुरवठा करावा, परिवहन उपक्रमाला पूर्ण वेळ व्यवस्थापक नियुक्त करुन शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारावी तसेच शहराला चार-पाच दिवस पाणी देत असल्याने यापूर्वीच्या ठरावाप्रमाणे ५० टक्के सूट देऊन पाणीपट्टीतील रक्कम कमी करावी व प्रत्यक्षात पाणी न देता आकारण्यात येणारी करपट्टी रद्द करावी आदी विविध मुद्यांवर चर्चा करून माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे लक्ष वेधले.
महानगरपालिकेचे २०२५-२६ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून या अंदाजपत्रकामध्ये शहरातील मूलभूत सुविधा, आरोग्यासह इतर विविध विकासकामांसाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच शहराच्या विकासासाठी व उत्पन्नवाढीसाठी काही सूचना व शिफारसी माजी महापौर अॅड. बेरिया यांनी आयुक्त डॉ. ओम्बासे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केल्या आहेत. शहरातील उद्याने भकास झालेली आहेत.
उद्यानाच्या विकासासाठी आणि स्मशानभूमी व मुस्लीम कब्रस्तान सुधारण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, मनपाच्या दवाखान्यातून गरिबांना मोफत औषधे मिळावीत, प्राणिसंग्रहालय, हुतात्मा बाग व किल्ला बागेचे नूतनीकरण, शहरातील उड्डाणपूल, पार्क स्टेडियम येथील सुविधा, हद्दवाढ भागात आधुनिक पध्दतीचे नाट्यगृह आदी विविध कामांबरोबरच महानगरपालिका, शिक्षण मंडळ व परिवहन विभागातील कर्मचा-यांना सातव्या वेतन फरकाच्या रकमेसाठी तरतूद करण्याची सूचना निवेदनातून केली आहे.
उत्पन्नवाढ व विकासासंदर्भातही काही सूचना त्यांनी केल्या आहेत. शेकडो मिळकतींच्या नोंदी दफ्तरी नाहीत. सर्व्हे करुन शहर व हद्दवाढ भागातील सर्व मिळकतींच्या नोंदी अद्ययावत कराव्यात, खुल्या जागेवर मिनी शॉपिंग सेंटर उभारण्यात यावे, मनपाच्या खुल्या जागांवर पे अॅण्ड पार्कच्या सुविधा देण्यात याव्यात, नवीन विकास योजनेतील अनावश्यक आरक्षणे कमी करावीत, परिवहन विभागासाठी नवीन मिनी बसेसची खरेदी करण्यात यावी, सात रस्ता व बुधवार पेठ येथील परिवहनच्या जागेत शॉपिंग सेंटर बांधण्यात यावे आदी सूचनांचा त्यात समावेश आहे.
अंदाजपत्रकातील तरतुदी व उत्पन्नवाढीच्या सूचनेचे निवेदन सादर केल्यानंतर अॅड. बेरिया व आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अल्लाबक्ष मनियार, सिध्दाराम उंबरजे, छगन बनसोडे, फय्याज शेख, राजेंद्र कोरे, रजाक मकानदार, जाकीर मनियार, एस. डी. अजनाळकर, नागेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.