नांदेड : प्रतिनिधी
मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यासह शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागास काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांची संवाद साधला तर जिल्हा प्रशासनाने पुरग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी सूचना केली.
नांदेड जिल्ह्यात सतत तीन दिवस मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. तर चौथ्या दिवशी मंगळवारी पावसाची रिपरिप सुरूच होती. सगल तीन दिवस झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यासह नांदेड शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने शेकडो जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असले तरी नागरिकांचे हाल सुरूच आहेत. या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी दुपारी शहरातील पुरग्रस्त भागास भेट दिली. यावेळी वाजेगाव येथील जुन्या पुलावरून पाहणी केली. यानंतर वाजेगाव, ईदगाह, हातई, खडकपुरा, गाडीपुरा, कालीका मंदिर परिसरात भेट देवून देशमुख यांनी नागरिकांची संवाद साधला.
तर जिल्हाधिका-यांशी संपर्क करून शहरातील अन्य पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी तातडीने हालवावे, त्यांना शासनाकडून २५ हजार रूपयांची मदत तातडीने करावी. यासोबत जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकरी आणि ग्रामस्थांनाही तातडीने मदत करावी अशी सूचना केली. यानंतर आमदार अमित देशमुख औंढा, कळमनूरी या भागाची पाहणी करण्यासाठी हिंगोलीकडे रवाना झाले. यावेळी काँगे्रसचे आ. मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, दिलीप बेटमोगरेकर, विठ्ठल पावडे, सत्यपाल सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.