परभणी : गंगाखेडचे माजी आ. सिताराम घनदाट मामा यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला. पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. घनदाट यांच्या या प्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळात भाजपच्या रणनितीत कोणते बदल होतील, या प्रवेशाचा स्थानिक राजकारणात काय परीणाम होईल हे उत्सुकतेचे ठरेल.
परभणीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा हा प्रवेश सोहळा ठरला आहे. अनुभवी नेतृत्व, प्रचंड जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमधील असलेली घट्ट पकड यामुळे घनदाट मामा यांचा हा भाजप प्रवेश हा पक्षासाठी मोठी रणनितीक चाल ठरणार आहे. घनदाट मामा यांनी १९९१ मध्ये भाजपाच्या तिकीटावर गंगाखेड विधानसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यांचा या निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झाला. यानंतर घनदाट मामा यांनी सलग ३ वेळा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढली आणि ते जिंकूनही आले. चौथ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर घनदाट मामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर घनदाट मामा यांनी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. परंतू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी त्यांचा पराभव केला.
आता घनदाट मामा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली असली तरी येथे भाजपचा मित्र पक्ष रासपचे आ.डॉ. गुट्टे विद्यमान आमदार आहेत.
त्यामुळे आता या दोघांमध्ये समन्वय कसा साधला जातो हे पुढील काळात दिसणार आहे. घनदाट मामा यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये जि.प. माजी अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, पाथरी मतदार संघाचे वंचितचे उमेदवार सुरेशराव फड, आनंदराव देशमुख, सरपंच गजानन कांगणे, रमेश गिते यांचा समावेश आहे. या सोहळ्यास माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, रामप्रभू मुंडे, अनंता बनसोडे, राजेश देशमुख, ज्ञानोबा मुंडे, सुरेश भुमरे, रवि जोशी, प्रशांत फड, रूपेश शिनगारे, नरहरी ढोणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी
सहकार क्षेत्रातील दिग्गज व अभ्युदय बँकेचे अध्यक्ष माजी आ. सिताराम घनदाट मामा यांच्या भाजप प्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीसाठी नवे राजकीय समिकरण तयार होऊ शकते. तसेच या समिकरणाचा नगर परिषद, १० जि.प. गट आणि १४ पंचायत समिती गणात थेट परीणाम होऊ शकतो. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी भाजपसाठी हा प्रवेश महत्वाचा आहे.