मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. निधानसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चव्हाण यांच्या पार्थिवावर संध्याकाळी उशीरा शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभाष चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावंत आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांनी प्रदेश काँग्रेसमध्ये सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. सुशीलकुमार शिंदे यांच्या आग्रहाखातर काँग्रेसने सुभाष चव्हाण यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. दरम्यान, चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.