मुंबई : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने हकालपट्टीची कारवाई करण्यात झालेले जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जेथलिया यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
सुरेश जेथलिया हे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत परतूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जेथलिया यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जेथलिया यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला जालना जिल्ह्यात राजकीय बळ मिळाले आहे.