पुणे : विशेष प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न, माजी खासदार प्रा. डॉ. ऍड. सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय रत्न समाज भूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अमरावती येथील ‘कलाजीवन संस्था’च्या वतीने पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसिद्ध साहित्यिका व समाजसेविका डॉ. अल्का नाईक, सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी सुपेकर, प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी प्रमोदराव नवाते आणि ऍड. रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गायकवाड यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. डॉ. गायकवाड यांनी खासदार म्हणून कार्यकाळात लातूर लोकसभा क्षेत्रात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचे व्यापक कौतुक झाले आहे. त्यांच्या कार्यामध्ये २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, नीट परीक्षेसाठी केंद्र स्थापन, राष्ट्रीय महामार्ग उभारणी, नव्या रेल्वे सेवा आणि पिटलाईन कार्यान्वयन, रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, हिंदी लायब्ररीची स्थापना, तसेच जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत विशेष कामे यांचा समावेश आहे.
याशिवाय लातूर शहरात १०० बोरवेल्स, स्वच्छतागृहे, सिटी बस थांबे उभारणी, तसेच संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत अनसरवडा गावाचा सर्वांगीण विकास साधण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अनाथ मुलांना आधार, कर्करोग व हृदयरुग्णांसाठी प्रधानमंत्री सहाय्य निधीतून कोट्यवधी रुपयांची मदत, तसेच दीडशेहून अधिक वकिलांना भारत सरकारकडून नोटरी नियुक्तीसाठी शिफारस केल्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली.
लोकसभेत सतत प्रश्न उपस्थित करून टेंभुर्णी रस्त्याचे काम व रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी पाठपुरावा केला. लातूर शहरातील ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या सर्व कार्याची दखल घेऊन डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना ‘राष्ट्रीय रत्न समाज भूषण जीवन गौरव पुरस्कार’’ बहाल करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.