मुंबई : प्रतिनिधी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी शुक्रवारी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पटले हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. शिशुपाल पटले यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेसला भंडारा-गोंदियात आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, या वेळी पटले यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आपण अनेक वर्षे भाजपामध्ये काम केले; पण आता तो भाजपा राहिलेला नाही. भाजपा आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचा आणि त्यातून सत्ता मिळविण्याचा हव्यास आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आवडलेला नाही, अशी टीका पटले यांनी केली.