नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. राज्यसभेत ३३ वर्षांची कारकीर्द गाजवल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्त होत आहेत.
त्यांच्यासोबतच राज्यसभेच्या ५४ खासदारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. यापैकी अनेक जण लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर काही खासदार असे आहेत ज्यांची पुन्हा राज्यसभेत नियुक्ती होणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ३ एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. सध्या ते ९१ वर्षांचे आहेत. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत.
उदार आर्थिक धोरण राबवणारे अशी ओळख
देशात उदार आर्थिक धोरण राबवणारे अशी ओळख असणारे डॉ. मनमोहन सिंग हे १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले होते. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. त्यानंतर २००४ ते २०१४ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते.
७ केंद्रीय मंत्रीही होतायत निवृत्त
निवृत्त होणा-या ५४ खासदारांमध्ये ७ केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. यात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचा कार्यकाळही संपतो आहे. यावेळी एल. मुरुगन आणि अश्विनी वैष्णव वगळता अन्य सर्व निवृत्त होत आहेत.
मंगळवारी राज्यसभेतून ४९ सदस्य निवृत्त झाले तर बुधवारी ५ जण निवृत्त होत आहेत. अशा पद्धतीने एकूण ५४ जण निवृत्त होत आहेत. यामध्ये समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना दुस-या कार्यकाळासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांचे भावनिक पत्र
मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आता तुम्ही सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत आहात. तीन दशकांहून अधिक काळ देशाची सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात, असे खर्गे यांनी म्हटले आहे.