सोलापूर : सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय ८०) यांचे आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शहराच्या पूर्व भागातील विणकर पद्मशाली समाजातून आलेले धर्मण्णा सादूल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. १९८९ सालची सार्वत्रिक आणि १९९१ सालच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत सादूल हे काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर मतदारसंघातून निवडून आले होते. अलिकडे त्यांनी वृध्दापकाळात प्रकृती साथ देत नसतानाही काँग्रेस पक्षातून बाहेर पडत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला होता. मात्र या पक्षातही ते सक्रिय नव्हते.